Soybean market price : सध्या गावाकडं चावडीवर, बाजारात, शेतात काम करताना एकच चर्चा सुरू आहे सोयाबीन विकायचं का अजून थांबायचं? कारण गेल्या दोन-तीन आठवड्यांपासून सोयाबीनच्या भावात हळूहळू सुधारणा दिसू लागली आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये कमी दरामुळे हताश झालेला शेतकरी आता थोडासा आशेने बाजाराकडे पाहतोय. भाव परत वर जाऊ लागल्याने अनेकांच्या मनात एक प्रश्न घर करून बसलाय जानेवारीत सोयाबीन ५५०० चा आकडा गाठणार का? Soybean market price
सध्याची बाजारस्थिती पाहिली, तर महाराष्ट्रासह मध्य प्रदेशात काही ठिकाणी प्रक्रिया उद्योगांचे खरेदी दर थेट ५१०० ते ५२०० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. कागदावर पाहिलं तर हे दर हमीभावाच्या अगदी जवळ आहेत. पण प्रत्यक्ष कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये चित्र थोडं वेगळं आहे. आजही बहुतांश बाजारात शेतकऱ्यांच्या हातात ४६०० ते ४८०० रुपयांचाच भाव पडतोय. म्हणजेच प्लँट्स ५००० च्या पुढं भाव देत असले, तरी सामान्य शेतकऱ्याला तो दर अजून मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे.
मग भाव वाढतोय का आणि पुढं वाढेल का, हा प्रश्न स्वाभाविक आहे. तज्ज्ञांच्या मते यंदा सोयाबीनच्या उत्पादनात घट झाली आहे. सुरुवातीला देशात ११० ते १०५ लाख टन उत्पादन होईल असा अंदाज होता, पण सध्या बाजारात येणारी आवक पाहता प्रत्यक्ष उत्पादन यापेक्षा कमी असण्याची दाट शक्यता आहे. त्यातच मागील वर्षाचा शिल्लक साठा कमी आहे. सोयापेंडला देशांतर्गत तसेच युरोप आणि शेजारील देशांतून चांगली मागणी आहे. या सगळ्या कारणांमुळे बाजाराला आधार मिळत आहे आणि भाव हळूहळू वर सरकतोय.
सरकारी धोरणांचाही यावर परिणाम होताना दिसतोय. मध्य प्रदेशात ‘भावांतर योजना’ लागू असल्याने तिथले शेतकरी निर्धास्तपणे माल विकत आहेत, कारण बाजारभाव कमी असला तरी फरक सरकार भरून काढते. महाराष्ट्रात नाफेड आणि इतर संस्थांकडून हमीभावाने खरेदी सुरू आहे. आतापर्यंत सुमारे पाच लाख टन सोयाबीनची खरेदी झाली आहे. मात्र मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात बारदाण्याचा तुटवडा, केंद्रांवरील अडचणी यामुळे खरेदीची गती मंदावली आहे. याचा फटका थेट शेतकऱ्याला बसतोय.
आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न शेतकऱ्यांनी काय करावं? तज्ज्ञ सांगतात, जर ऑक्टोबरमध्ये पीक हातात आल्यानंतर आजपर्यंत तुम्ही तीन महिने थांबू शकला असाल, तर आत्ता घाईघाईत कमी भावात सोयाबीन विकू नका. पैशांची फार मोठी अडचण नसेल, तर ५००० रुपयांच्या खाली विक्री टाळावी. सध्या हमीभाव आणि बाजारभावात ४०० ते ५०० रुपयांचा फरक आहे. काही ठिकाणी ५००० च्या आसपास किंवा त्यापेक्षा जास्त दर मिळत असतील, तरच विक्रीचा विचार करावा. पॅनिक होऊन माल विकला, तर पुढं भाव वाढला तरी हात चोळत बसायची वेळ येऊ शकते.
एकंदरीत पाहिलं तर बाजाराची दिशा सध्या तेजीकडेच आहे. पुरवठा कमी, मागणी चांगली आणि सरकारी खरेदी सुरू असल्याने जानेवारी महिन्यात सोयाबीनच्या दरात आणखी सुधारणा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र बाजार हा नेहमीच बदलणारा असतो. त्यामुळे अफवांवर नव्हे, तर आपल्या भागातील बाजारभाव, साठवणूक क्षमता आणि आर्थिक गरज लक्षात घेऊनच निर्णय घ्यावा, असा तज्ज्ञांचा सल्ला आहे.
महत्वाचे : वरील माहिती तज्ज्ञांच्या अंदाजावर आधारित आहे. प्रत्यक्ष विक्री करताना स्थानिक बाजाराचा अभ्यास करूनच निर्णय घ्यावा.
हे पण वाचा | लाडक्या बहिणींच्या खात्यात येणार तीन हजार रुपये? मकर संक्रांतीनिमित्त मिळणार मोठी भेट