2026 मध्ये पावसाळा कसा असणार? हवामान खात्याचा नवीन अंदाज काय सांगतो पहा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Havaman Andaaz News 2026 : गेल्या वर्षी पावसाने महाराष्ट्राला भरभरून दिलं. सुरुवातीला काही जिल्ह्यांमध्ये ढगांनी पाठ फिरवली होती पण नंतर अचानक आलेल्या मुसळधार सरींनी काही दिवसांतच सगळी कसर भरून काढली. कमी दिवसांत जास्त पाऊस नद्या-नाले तुडुंब धरणं भरली पण याच पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेलं पीक वाहून गेलं. त्यामुळेच आता नवीन वर्ष सुरू होताच एकच प्रश्न सगळ्यांच्या मनात घोळतोय यंदाचा म्हणजेच 2026 चा पावसाळा नेमका कसा राहणार? Havaman Andaaz News 2026

आणि याच प्रश्नाचं उत्तर शोधत असतानाच स्कायमेट या खासगी हवामान अंदाज वर्तवणाऱ्या संस्थेकडून आलेल्या माहितीनं अनेकांच्या काळजात धडकी भरवली आहे. कारण 2026 च्या मान्सूनबाबत त्यांनी दिलेला अंदाज हा समाधान देणारा नाही. उलट यंदाचा पावसाळा अपेक्षेप्रमाणे न होण्याची आणि काही भागांमध्ये दुष्काळसदृश स्थिती निर्माण होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.

सध्या सोशल मीडियावर 2026 मध्ये पाणीटंचाई यंदा पावसाळा दगा देणार अशा चर्चा आधीच रंगल्या होत्या. स्कायमेटच्या या अंदाजामुळे त्या चर्चांना आता अधिकच बळ मिळताना दिसत आहे. विशेष म्हणजे या अंदाजामागचं कारणही तितकंच गंभीर आहे एल निनो.

नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच पावसानं अनपेक्षित हजेरी लावली. मुंबईत अचानक सरी कोसळल्या, काही ठिकाणी ढगाळ वातावरण जाणवलं. अनेकांना वाटलं यंदा पाऊस वेळेआधीच संकेत देतोय. पण हवामान तज्ज्ञ सांगतात की हा पाऊस फसवा ठरू शकतो. कारण खरी परीक्षा असते ती जून ते सप्टेंबरच्या मान्सून काळात आणि तिथेच अडचण निर्माण होण्याची चिन्हं दिसत आहेत.

स्कायमेटचे हवामान तज्ज्ञ महेश पलावत यांच्या मते गेल्या वर्षी मान्सूनवर ला निनाचा प्रभाव होता त्यामुळे पावसाला बळ मिळालं. सध्या प्रशांत महासागरात अजूनही ला निनाची स्थिती आहे म्हणून आतापर्यंत हवामान काहीसं अनुकूल वाटत आहे. मात्र ही परिस्थिती कायम राहणार नाही. येत्या काही महिन्यांत प्रशांत महासागराच्या तापमानात मोठा बदल होण्याची शक्यता असून तेच एल निनोला जन्म देऊ शकतं.

सध्या प्रशांत महासागराचं तापमान तुलनेने कमी आहे. मार्च 2026 पर्यंत ते सामान्य पातळीवर येईल, असा अंदाज आहे. पण त्यानंतर तापमान झपाट्याने वाढण्याची चिन्हं आहेत. एप्रिल, मे, जून या काळात जर तापमान वाढत गेलं, तर एल निनोची स्थिती तयार होऊ शकते. आणि एकदा एल निनो सक्रिय झाला, की त्याचा थेट परिणाम भारतीय नैऋत्य मान्सूनवर होतो.

इतिहास सांगतो की एल निनोच्या काळात मान्सून कमकुवत राहतो. पावसाचं वितरण बिघडतं काही ठिकाणी जोरदार पाऊस तर अनेक भागांमध्ये दीर्घकाळ कोरडं हवामान अशी स्थिती निर्माण होते. यामुळे शेतीवर अवलंबून असलेल्या लोकांसमोर मोठं संकट उभं राहतं. स्कायमेटचा अंदाजही याच दिशेने इशारा देतोय की 2026 मध्ये मान्सून सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मात्र तज्ज्ञ हेही स्पष्ट सांगतात की हा अंदाज सध्या प्राथमिक स्वरूपाचा आहे. अजून परिस्थिती पूर्णपणे ठरलेली नाही. भारतीय हवामान विभाग एप्रिल 2026 मध्ये मान्सूनबाबतचा पहिला अधिकृत अंदाज जाहीर करणार आहे. त्यानंतरच चित्र अधिक स्पष्ट होईल.

तोपर्यंत मात्र स्कायमेटच्या या इशाऱ्यामुळे चिंता वाढणं साहजिक आहे. कारण पावसावर अवलंबून असलेलं संपूर्ण गणित शेती पाणी साठा बाजारभाव सगळंच या एका घटकावर ठरलेलं असतं. 2026 चा पावसाळा खरंच दगा देणार की निसर्ग शेवटच्या क्षणी दिलासा देणार हे येणाऱ्या काही महिन्यांतच कळेल. पण आत्ताचं चित्र पाहता यंदाचा मान्सून सगळ्यांची कसोटी पाहणार एवढं मात्र नक्की.

हे पण वाचा | Ladki Bahin Yojana: मकर संक्रांतीनिमित्त महिलांना मिळणार मोठे गिफ्ट! एक सोबत जमा होणार ₹3000?

1 thought on “2026 मध्ये पावसाळा कसा असणार? हवामान खात्याचा नवीन अंदाज काय सांगतो पहा”

Leave a Comment

error: Content is protected !!