2026 weather forecast : गावाकडं सध्या एकच चर्चा सुरू आहे २०२६ चा पाऊस कसा असेल? पेरणीच्या आधीच ढगाऐवजी चिंता डोक्यावर बसली आहे. कारण पुन्हा एकदा एल निनो येतोय अशी चर्चा जोर धरतेय. मागील काही वर्षांत पावसाने अनेक वेळा पाठ फिरवल्याचं शेतकऱ्यांनी अनुभवलंय त्यामुळे एल-निनोचं नाव जरी कानावर पडलं तरी मनात धस्स होतं. खरंच २०२६ मध्ये दुष्काळाची परिस्थिती निर्माण होणार का की हा फक्त अंदाजांचा खेळ आहे हे जाणून घेणं आज गरजेचं ठरतंय.
सध्या जागतिक हवामान पातळीवर मोठे बदल घडताना दिसत आहेत. प्रशांत महासागरात आत्तापर्यंत ला-निना’ची स्थिती होती ज्यामुळे काही प्रमाणात पावसाला मदत झाली. मात्र आता ही स्थिती हळूहळू कमकुवत होत चालली आहे. हवामान तज्ज्ञांच्या निरीक्षणानुसार पश्चिम प्रशांत महासागरातील पाणी तापू लागलं आहे. ही उष्णता फक्त वरवर नाही, तर समुद्राच्या १०० ते २५० मीटर खोलीपर्यंत पोहोचलेली आहे. आणि हाच बदल पुढे जाऊन एल-निनो ची परिस्थिती तयार करतो,l असं सांगितलं जातंय. 2026 weather forecast
आंतरराष्ट्रीय हवामान संस्थांचे अंदाज पाहिले तर चिंता वाढवणारे चित्र समोर येत आहे. युरोपियन सेंटर फॉर मिडियम रेंज वेदर फोरकास्ट आणि ‘सीव्हिअर वेदर युरोप’ या संस्थांनी असा इशारा दिला आहे की, २०२६ च्या उन्हाळ्यापर्यंत एल-निनोची स्थिती तयार होऊ शकते. विशेष म्हणजे वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत हा प्रभाव अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे आणि तो २०२६-२७ पर्यंत टिकू शकतो. अमेरिकेच्या NOAA या हवामान संस्थेनेही २०२६ च्या उत्तरार्धात एल-निनो सक्रिय होण्याची सुमारे ४८ टक्के शक्यता वर्तवली आहे.
आपल्या देशातही हवामान विभाग याकडे बारकाईने लक्ष ठेवून आहे. भारतीय हवामान विभागाचे प्रमुख तज्ज्ञ मृत्युंजय महापात्रा यांनी जून-जुलै-ऑगस्ट या कालावधीत एल-निनोची शक्यता वाढू शकते, असे प्राथमिक अंदाजात नमूद केले आहे. म्हणजेच, मान्सूनच्या मध्य आणि शेवटच्या टप्प्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो, अशी शक्यता नाकारता येत नाही.
जर एल-निनोचा प्रभाव खरोखरच वाढला, तर त्याचा थेट फटका मान्सूनवर बसू शकतो. विशेषतः जुलै ते सप्टेंबर या काळात पावसात खंड पडण्याची, पावसाची तूट जाणवण्याची भीती व्यक्त केली जात आहे. इतिहासाकडे पाहिलं तर, १८७१ ते २०२३ या काळात एल-निनोची बहुतांश वर्षे भारतासाठी प्रतिकूल ठरलेली आहेत. गेल्या दीडशे वर्षांत एल-निनो असताना फक्त चार वेळा देशात सरासरी पाऊस झाला उरलेल्या बहुतांश वेळा पावसात १० ते २० टक्क्यांपर्यंत तूट दिसून आली आहे. आणि पावसावर अवलंबून असलेल्या आपल्या शेतीसाठी ही बाब खूपच चिंतेची आहे.
मात्र, इथे एक गोष्ट स्पष्टपणे लक्षात ठेवायला हवी. एल-निनो (El-Nino) म्हणजे हमखास दुष्काळच पडेल असं ठामपणे कोणीही सांगू शकत नाही. काही वर्षांत एल-निनो असूनही पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याची उदाहरणेही आहेत. सध्या जे अंदाज दिले जात आहेत, ते प्राथमिक स्वरूपाचे आहेत. पुढील काही महिन्यांत समुद्राचे तापमान, वाऱ्यांची दिशा आणि इतर घटकांवरून चित्र अधिक स्पष्ट होईल.
आजही आपल्या देशातील सुमारे ५१ टक्के शेती पावसावर अवलंबून आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून न जाता सावध राहणं पिकांची निवड विचारपूर्वक करणं पाण्याचं नियोजन करणं आणि हवामानाच्या ताज्या अपडेट्सवर लक्ष ठेवणं फार महत्त्वाचं आहे. वेळेआधी घेतलेली काळजीच उद्याच्या संकटाला तोंड देण्याची ताकद देऊ शकते.
२०२६ चा मान्सून नेमका कसा असेल हे वेळच सांगेल. पण सध्या तरी एल-निनोची टांगती तलवार शेतकऱ्यांच्या डोक्यावर असल्याचं चित्र आहे. पुढील काही महिन्यांत येणाऱ्या अधिकृत अंदाजांकडे सगळ्यांचंच लक्ष लागून राहणार आहे.
हे पण वाचा | राज्याच्या वातावरणात या तारखेपासून होणार मोठा बदल; पंजाब डख यांचा शेतकऱ्यांसाठी मोठा इशारा